अनिल ठाकरे, चंद्रपूर
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते.
नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रुपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रुपाचे अर्थात देवी शैलपुत्रीची आज पूजा केली जाते.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे प्रसिद्ध देवी महाकाली मंदिर आज पहाटे पाच वाजताच महाआरतीसाठी खुले झाले. चंद्रपूरच्या या आराध्य देवीचे दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या.
गाभाऱ्यात थेट प्रवेश आज असल्याने भाविकांनी दर्शन घेत मातेला साडी-चोळी अर्पण केली. आज मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला पाहायला मिळाला. नवरात्रात देवी महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.